धनिकाला मागितली होती 80 लाखांची खंडणी
महाबळेश्वर – येथील एका गृहनिर्माण सोसायटीत एका धनिकाने विनापरवाना बांधलेल्या बंगल्यातील काही बांधकाम वाचविण्यासाठी तब्बल 80 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या बाळ्या उर्फ संजय साळुंखे, हेमंत उर्फ सोनू साळवी व इम्रान मानकर यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे तिघेही संशयित सुखवस्तू कुटुंबातील असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अटकेच्या भीतीमुळे तिन्ही खंडणीखोर पसार झाले आहेत.
याबाबत माहिती अशी, येथील सि. स. नं. 210 मध्ये धनदांडग्यांची गृहनिर्माण सोसायटी आहे. ही सोसायटी गेल्या अनेक वर्षांपासून अंतर्गत आर्थिक घोटाळे, विनापरवाना बांधकामे, बेकायदेशीर वृक्षतोड, मारामाऱ्या, ऍट्रॉसिटी अशा कारणांनी गाजत आहे.
सोसायटीचे अनेक सदस्य स्थानिक आहेत तर काही परगावचे धनिक आहेत. अनेक सदस्यांनी विनापरवाना बांधकामे केली आहेत. विनापरवाना वृक्षतोड व बांधकामासंदर्भात पालिकेने कारवाईच्या नोटिसा अनेक सदस्यांना बजावल्या आहेत. त्यात अल्पेश सागरमल शहा यांचाही अवैध बंगला आहे.
हा बंगला पालिकेच्या कारवाईतून वाचविण्यासाठी सोसायटीतील बाळू उर्फ संजय साळंखे, हेमंत उर्फ सोनू साळवी व इम्रान मानकर यांनी शहांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यांनी शहा यांना 80 लाखांच्या खंडणी मागितली. त्यास अल्पेश यांनी नकार दिला होता. अनेक दिवस होऊनही शहा खंडणी देत नसल्याचे पाहून बाळू साळुंखेने ऍट्रॉसिटीची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. या धमकीमुळे शहा घाबरले.
बाळूने काही वर्षांपूर्वी याच सोसायटीतील काही धनिकांना ब्लकमेल करून लाखो रुपयांची माया गोळा केली होती. अखेर अल्पेश शहा यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांच्या विरोधात दि. 7 रोजी भादंवि कलम 384, 427 , 506 व 34 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे खंडणीखोर फरारी झाले आहेत. या युवकांची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू आहे.
यातील संजय साळुंखेचे बाजारपेठेत हिंद फुटवेअर हे मोठे दुकान आणि वाई एमआयडीसीत चपलांचा कारखाना, महाबळेश्वर येथे अनेक मिळकती आहेत. सोनू हा एका धनिकाचा पुत्र असून त्याचे बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी रेस्टॉरंट व बार आहे. इम्रान हा बांधकाम व्यवसायिक असून महाबळेश्वर व पाचगणीत त्याच्या मिळकती आहेत.