कराड – कराड जनता बॅंकेवर असलेल्या निर्बंधांची मुदत 9 मार्चला संपताच बॅंकेचे महाप्रबंधक योगेश दयाल यांनी त्याच दिवशी बॅंकेवरील निर्बंध आणखी तीन महिने वाढ करत 9 जून 2020 पर्यंत निर्बंध कायम ठेवले. त्यामुळे ठेवीदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
एनपीए वाढल्याने कराड जनता बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने 7 नोव्हेंबर 2017 रोजी बॅंकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले होते. तेंव्हापासून बॅंकेचे संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. सर्व सामान्यांची बॅंक म्हणून कराड जनता बॅंकेकडे पाहिले जात असताना या बॅंकेवर निर्बंध घालण्यात आल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. हे निर्बंध सुरूवातीच्या काळात सहा महिन्यांसाठी होते.
प्रत्येक सहा महिन्याला बॅंकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन या निर्बंधांची मुदत वाढवण्यात आली ही मुदत 9 मार्च 2020 अखेर संपताच बॅंकेचे महाप्रबंधक योगेश दयाल यांनी मंगळवारी, 9 मार्च रोजी बॅंकेवरील निर्बंध आणखी तीन महिने वाढ केली. 9 जून 2020 पर्यंत बॅंकेवर निर्बंध कायम राहतील, असे निर्देश दिले आहेत.
कराड जनता बॅंकेवर सुमारे अडीच वर्षापासून निर्बंध आहेत, असे असतानाही बॅंक अद्यापही एनपीएमधून बाहेर आलेली नाही. बॅंकेने दिलेल्या मोठ्या कर्जांची वसुली ही सर्वात मोठी अडचण आहे.
दरम्यानच्या काळात बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकांनीही वसुलीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र, वसुली अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने आणखी तीन महिन्यांनी निर्बंधांची मुदत वाढवली आहे.