नवी दिल्ली – मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली आहे. यामुळे सिंधिया भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यातील मतभेदांमुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अडचणीत आले आहे. भाजपच्या सूत्रानुसार, ज्योतिरादित्य सिंधिया यांना पक्षात सामील करून घेण्याच्या योजनेवर काम चालू आहे. भाजपकडून सिंधिया यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांना समर्थन करणारे काँग्रेसमधील बंडखोर आमदार विधानसभा अध्यक्षांना आपला राजीनामा पाठवण्याची शक्यता आहे. यामुळे ४८ तासात कमलनाथ सरकार अल्पमतात येईल. आणि यानंतर शिवराज सिंह चौहान सत्तास्थापनेचा दावा करतील, असेही भाजपने सांगितले आहे.