पुणे – दरवर्षीप्रमाणे यंदादेखील जागतिक महिलादिनी (दि.8 ) महिलासांठी मोफत पीएमपी बससेवा उपलब्ध राहणार आहे. प्रवासी संख्या वाढवण्याबरोबरच महिलांना सुरक्षित प्रवास करता प्रोत्साहन मिळावे, यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या “तेजस्विनी’ बससेवेला यंदा वर्ष पूर्ण होत आहे.
सध्या पीएमपीच्या ताफ्यात 33 “तेजस्विनी’ बसेस आहेत. यंदाही महिलादिनी ही बससेवा मोफत उपलब्ध असेल. तसेच प्रत्येक महिन्याच्या आठ तारखेला मोफत सेवा देण्याचा निर्णय यापुढेही कायम राहणार आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा, यासाठी महिलांसाठी महिन्यातून एक दिवस मोफत प्रवासाची योजना गेल्यावर्षी सुरू करण्यात आली. राज्य सरकारच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या तेजस्विनी बसेसमधून ही सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे ही सेवा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पीएमपीच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले.