राज्य सरकार उभारणार रिंग रोड
मुंबई : पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून येत्या काळात पुणेकरांची सुटका होणार आहे. कारण त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. पुण्यात रिंग रोड उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात केली. अजित पवार यांनी सांगितले की, नाशिक, औरंगबाद, हैदराबाद, बंगळुरू आणि मुंबई शहरातून येणार वाहतूक पुणे शहराबाहेरून वळवण्यासाठी 170 किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रस्तावित आहे. यासाठी भूसंपादनासह एकूण 15 हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या वर्षी भूसंपादन सुरू करून येत्या चार वर्षांत हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
नितीन गडकरी यांनी यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, यासंदर्भात गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची बैठक झाली. केंद्रीय रस्ते निधीमधून राज्याला 1200 कोटी रूपये देण्याचे कबुल केले आहे. त्याबद्दल मी नितीन गडकरी यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या या मदतीचा राज्याला निश्चितच फायदा होणार असल्याचेही यावेळी अजित पवार यांनी म्हटले. पुण्यातील रिंग रोडची संपूर्ण रक्कम राज्य सरकारने जमीन घेण्यासाठी खर्च करावी, रस्ते उभारणीचा खर्च केंद्र सरकार करेल, असेही गडकरींनी सांगितल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केले.