बेल्हे – येथील समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक महाविद्यालयातील तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांमध्ये शिकत असलेले दिगंबर सुम्बरे, तेजस गुंजाळ,विजय फुटाणे व रोहन नाईकवाडी यांनी तयार केलेल्या “विद्युत कोळपणी यंत्र’ प्रकल्पास खोडद येथील राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळाला असल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
कोळपणी यंत्र हे दोन इलक्ट्रिक बॅटऱ्यांच्या साहाय्याने 2650 आरपीएम वेगाने कार्य करणारी डीसी मोटर वापरून सायकलची चाके फिरण्यासाठी त्याचा वापर केला जातो.याच 2650 आरपीएमचे रूपांतर गियर कार्यप्रणालीच्या साहाय्याने 300 आरपीएममध्ये करून यंत्राची कार्यक्षमता वाढवली जाते. यंत्रामध्ये गिअर मोटर, इलक्ट्रिक बॅटरी, एक्सलरेटर, कंट्रोलर,बॅटरी इंडिकेटर असे वेगवेगळे घटक कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.
जुन्नर, आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी या प्रकल्पास भेट दिली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून या यंत्राचा वापर हा बहुपर्यायी म्हणून करता येतो. विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले. या यंत्राची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रा. सचिन पोखरकर, प्रा. नंदकिशोर मुऱ्हेकर, प्रा. संजय कंधारे, प्रा. महेंद्र खटाटे, सचिन दिवेकर,राजेंद्र फुलवडे यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले.
संकुलातील विद्यार्थी नवनवीन समाजाभिमुख प्रकल्प तयार करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.