भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण
मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चौकशीसाठी बोलावले आहे की नाही याबद्दल माहिती नसल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या चौकशी आयोगाने शरद पवार यांना चौकशीसाठी बोलावावे, अशी मागणी होत आहे. तसं त्यांना बोलवण्यात येणार आहे का? असा प्रश्न विधान परिषदेत आमदार विनायक मेटे यांनी विचारला. त्यावेळी देशमुख यांनी “नरो वा, कुंजरो वा’ भूमिका घेतली.
राज्य सरकार एकीकडे या प्रकरणी कानावर हात ठेवत असताना आमदार विनायक मेटे यांनी आयोगाचे वकील आशीष सातपुते यांनी मात्र, शरद पवार यांना चौकशी आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले जाईल, असे म्हटल्याची माहिती दिली.
या प्रकरणाच्या सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात पवार यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. या आयोगाला महाविकास आघाडी सरकारने अहवाल सादर करण्यासाठी 8 एप्रिलपर्यंतची शेवटची मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणी विवेक मंच या सामाजिक संस्थेचे सदस्य सागर शिंदे यांनी शरद पवार यांची या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करणारा अर्ज आयोगासमोर सादर केला होता. त्यासाठी 2018 साली पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांचा आधार घेतला होता.