पुणे -“डेल्टा प्लस व्हेरिएंट’ची लागण झालेल्या एकाही नव्या रुग्णाची नोंद महाराष्ट्रात नसून, त्यामुळे मे महिन्यात जे 21 रुग्ण सापडले होते, तेवढीच नोंद आतापर्यंत झाली आहे. दिल्लीतील प्रयोगशाळेत यासंदर्भात झालेल्या “जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी’ अहवालातून ही बाब पुढे आल्याची माहिती राज्याच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रातून 3600 नमुने “जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी’साठी दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यामध्ये मे महिन्यापासून ते पुढील तीन महिन्यांत बाधित झालेल्यांचे नमुने तपासण्यात आले होते. मे महिन्यात रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7 आणि मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर येथे प्रत्येकी एक असे 21 डेल्टा प्लस व्हेरिएंट’चे रुग्ण सापडले होते. संपूर्ण भारतात सुमारे 81 “डेल्टा प्लस’चे रुग्ण सापडले होते. त्यातील 21 बाधित महाराष्ट्रातीलच होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांतून प्रत्येकी 100 असे 3 हजार 600 करोनाबाधितांचे नमुने दिल्लीला “सीएसआयआर – इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी’ या संस्थेत पाठवले होते. या संस्थेशी यावर्षी एप्रिल महिन्यातच राज्य सरकारचा करार झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी हे नमुने तपासण्यात आले. त्यानुसार या संस्थेचा रिपोर्ट आला असून, त्यामधील नमुन्यांमध्ये नवा डेल्टा प्लस व्हेरिएंट’ सापडला नसल्याचे डॉ. आवटे यांनी नमूद केले. हा व्हेरिएंट सापडला नसला तरी खबरदारी घेतली जात असून, “डेल्टा प्लस’ आणि तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केल्याचे डॉ. आवटे यांनी नमूद केले. याच संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांबाबतची खबरदारी घेतली जात आहे. त्यांना जास्त धोका नाही असे म्हटले जात असले, काळजी घेणे आवश्यक असून, लहान मुलांना त्यांचे राहिलेले डोस द्या, असे आवाहन डॉ. आवटे यांनी केले आहे.