पिंपरी : औद्योगिकनगरीची आता सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख होऊ पहात आहे. परंतु मराठी भाषा संवर्धनाबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका निष्क्रीय असल्याचे दिसून येत आहे. मराठी भाषा संवर्धन समिती ही केवळ कागदोपत्रीच उरली असल्याचा आरोप शहरातील लेखक, कवी व साहित्यिकांनी केला आहे.
महापालिकेला मराठी भाषेच्या संवर्धनात रस नाही. त्यामुळे शहरातील मराठी भाषेचे संवर्धन करणाऱ्या संस्थांना पालिकेने भरीव अर्थसाह्य देऊन मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा साहित्यिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.
पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने मराठी भाषासंवर्धन समिती स्थापन केली.
परंतु याबाबत अंदाजपत्रकात तरतूद व बैठकांबाबत महापालिका निष्क्रीय आहे. समिती स्थापनेला जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ लोटला, परंतु या काळात केवळ दोनच बैठका झाल्या. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी शहरातील साहित्यिक, संस्था प्रयत्नशील आहेत.