- एक महिन्यापूर्वीच झाला होता विवाह
पिंपरी – एक महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहितेने आपल्या पतीकडे घटस्फोट मागितला. या कारणावरून चिडलेल्या पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिघी येथील मॅक्झिन चौकातील एका लॉजवर शनिवारी (दि. 22) सकाळी घडली.
स्नेहा विशाल डोंगरे (वय 26) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. विशाल अंकुश डोंगरे (वय 30, दोघेही रा. दक्षिण लक्ष्मी नारायण नगर, मोशी) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि विशाल यांचा महिनाभरापूर्वी विवाह झाला. विशाल सध्या काहीही कामधंदा करीत नाही. तसेच लग्नापूर्वी त्याचे प्रेमप्रकरण होते. याची माहिती स्नेहाला कळाल्यावर ती विशालपासून विभक्त राहू लागली.
तसेच तिने विशालकडे घटस्फोटाची मागणी केली होती. घटस्फोटाबाबत बोलणी करण्यासाठी स्नेहाला दिघीच्या मॅक्झिन चौकातील आश्रय लॉजवर सकाळी अकरा वाजताच्या सुमारास बोलविले. विशालच्या पहिल्या प्रेमप्रकरणाबाबत बोलणी सुरू असताना विशालने अचानक चाकूने हल्ला केला.
त्याने स्नेहाच्या दोन्ही हातांवर आणि पोटावर चाकूने वार करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्नेहा हिला मोशीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी विशाल याला दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.