साताऱ्यात पोलीस बंदोबस्तात कारवाई; आरटीओ कार्यालय परिसराने घेतला मोकळा श्वास
सातारा – सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने मुख्याधिकारी शंकर गोरे व बांधकाम अभियंता भाऊसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पाच तासांत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चौक मोकळा केला. बुलडोझरच्या पात्यांनी लोखंडी अँगल व काही बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पाच टपऱ्या जप्त करण्यात आल्या. तर आरटीओ कार्यालयाबाहेरील एजंटांनी स्वतःची शेड काढून घेतली. दरम्यान, पोलिसांच्या शहर वाहतूक विभागाने सातारा बस स्थानक ते आयआरके सिनेमा इमारतीलगतच्या फूटपाथवरील फळगाडे हटविले.
प्रशासन व विक्रेते यांच्यात प्रचंड वादावादीचे प्रसंग उद्भवले; पण कोणत्याही दबावाला ना पोलिस दल, ना सातारा पालिका अजिबात बधली नाही. सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील दुकाने, टपऱ्या, गुऱ्हाळघरे तसेच इतर अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.
या कारवाईच्या धास्तीने काही विक्रेत्यांनी व एजंटांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढली. अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम व शैलेश अष्टेकर या जोडगोळीशी काही जणांनी प्रचंड वाद घातला. मात्र, मुख्याधिकारी शंकर गोरे व अभियंता भाऊसाहेब गोरे, अभियंता पथक, भाग निरीक्षक आणि जय्यत पोलीस बंदोबस्त यामुळे कोणाची जास्त ब्र करायची हिंमत झाली नाही. अतिक्रमण मोहिमेत प्रशासकीय कणखरता दिसल्याने एजंटांनी स्वतःहून लोखंडी शेड काढायला प्रारंभ केला. या कारवाईत पाच टपऱ्या जप्त करण्यात आल्या.
काही भंगार वाहने उचलून टीपरमध्ये घालण्यात आली. यानंतर आरटीओ चौक अवघ्या पाच तासात मोकळा करण्यात आला. पालिकेने आरटीओ चौक तर वाहतूक विभागाने सातारा एसटी स्थानक परिसराचा ताण सांभाळला. वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने सातारा बस स्थानक ते आयआरके सिनेमा इमारत या दरम्यानचे गाडे हटवण्याचे काम केले.
हॉटेल मनाली कॉर्नर, बाजार समिती कॉर्नर येथील भाजी विक्रेत्यांनाही अटकाव करण्यात आला. सकाळी नऊ वाजल्यापासून वाहतूक विभाग याच मोहिमेवर होता. काही महिलांचे साहित्य जप्त झाल्याने त्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ आली.
या मोहिमेत पोलिसांचा विक्रेत्यांशी बराच वाद झाला. मात्र फूटपाथ पादचाऱ्यांसाठी आहे, रस्त्यावर बसाल तर गुन्हे दाखल करू, अशी रोखठोक भूमिका पोलिसांनी घेतल्याने विक्रेत्यांचा नाइलाज झाला. पोलीस प्रशासनाच्या या कारवाईच्या निषेधार्थ मंगळवारी “रास्ता रोको’चा इशारा देण्यात आला आहे.
पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. पहिल्याच दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील चहाच्या गाड्या, टपऱ्या, गुऱ्हाळघरे तसेच इतर बांधकामे जेसीबी व बुलडोझरच्या साह्याने हटविण्यात आली. त्यामुळे अजिंक्य चौक ते झेडपी मैदान व अजिंक्य चौक ते केबीपी कॉलेज चौक या दोन्ही रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. कडेकोट पोलिस बंदोबस्तात दिवसभर ही मोहीम सुरू होती. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी स्वतः या मोहिमेत सहभाग घेतला, याचीही घटनास्थळी जोरदार चर्चा होती.