232 कोटी थकबाकीपैकी 45 कोटी वसूल
नगर – महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी थकीत मालकत्ता कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मालमत्ताकराची थकित वसुली का होत नाही, असा सवाल करत बड्या थकबाकीदारांची नावे फ्लेक्स बोर्डवर झळकाविण्याचे आदेश त्यांनी दिले.
तसेच वेळ पडल्यास पोलीस बंदोबस्तात जप्तीची कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याला आता मुहूर्त मिळाला असून पाच लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची नावे फ्लेक्स बोर्डावर छापून ती चौका-चौकात लावण्यात येणार आहे. याबाबत वेळोवेळी दैनिक प्रभातने पाठपुरावा केला होता.
जिल्हाधिकारी यांनी वसुलीबाबत वेळोवेळी आढावा बैठक घेवून उपायुक्त, करसंकलन अधिकारी गबाजी झिने, प्रभाग अधिकारी अशोक साबळे, नानासाहेब गोसावी, जितेंद्र सारसर, अंबादास सोनवणे यांच्यासह कर निरीक्षककांना सूचना केल्या होत्या.
मालमत्ताकराची सुमारे 282 कोटी रुपयांची थकबाकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी असून, वसुली का होत नाही, असा सवाल त्यांनी केला होता. मालमत्ताकराच्या वसुलीवर भर द्यावा, तसेच मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे. या थकबाकीदारांची नावे फ्लेक्स बोर्डवर लावण्यात यावीत. जप्तीच्या नोटिसा बजावून मालत्ताकराची वसुली, लिलावा प्रक्रिया, पोलीस बंदोबस्त घेण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
मनपाच्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांना सरासरी दहा कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. मार्च अखेरपर्यंत 50 कोटींपर्यंत वसुली करण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आजपर्यंत 45 कोटी 13 लाखांची तुटपुंजी वसुली झाली आहे.