बेल्हे – निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात युवा महोत्सव जल्लोषात पार पडला. युवा महोत्सवातील सहा दिवसांमध्ये क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन, निबंध, सुंदर हस्ताक्षर, पाककला, रांगोळी, मेंदी, पुष्पगुच्छ या विविध स्पर्धा आणि कॅप-डे, ब्लॅक अँड व्हाईट-डे, चॉकलेट डे, टाय-डे, मिसमॅच-डे, ट्रॅडिशनल-डे साजरे करण्यात आले.
महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये नैपुण्य, उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि मागील वर्षाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन प्रमुख पाहुण्यांचा हस्ते गौरविण्यात आले, तसेच श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान ही संस्था रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याने संस्थेकडून सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हभप रमेशमहाराज कुलकर्णी (वासुंदे, ता. पारनेर), हभप नानामहाराज गांडाळ (आणे), हभप बाळशीराममहाराज बांगर (बेल्हे), हभप बजरंग महाराज आंधळे (कर्जुले हर्या, ता. पारनेर) यांस पांडुरंग गौरव पुरस्कार; ज्ञानेश्वर खराडे (मंगरूळ), पोपट दाते (आणे), कारभारी औटी (राजुरी), विष्णू उनवणे (निमगाव सावा) यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या गौरवास्पद कार्याबद्दल विश्वामित्र गौरव पुरस्कार; सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल शिवाजी चव्हाण (पारगाव), धोंडिभाऊ पिंगट (बेल्हे), राजाराम चौधरी (शिरोली बु.), ज्ञानदेव मुळे (साकोरी) यांना दिलीप गौरव पुरस्कार आणि शिक्षणातील गुणवत्तेबाबत श्रेया दाते (अणे), स्नेहल पिंगट (बेल्हे), प्राजक्ता तिकोने (रानमळा) यांना एकलव्य गौरव पुरस्काराने सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, डॉ. पंजाबराव कथे आणि पुणे जिल्हा पुणेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग पवार यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ, पुस्तक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी कानिफनाथ डुकरे, प्रांजल विश्वासराव, मंगेश थोरात यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, मुंबई येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन गायकवाड, उद्योजक उमेश कामठे, गावच्या सरपंच सुनीता घोडे, उपसरपंच नजीर अहमद, चौगुले कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी, पालक उपस्थित होते.