शिक्षण मंडळाचा कारभार; ठेकेदार डोळ्यांसमोर ठेवून निविदा काढण्याचा प्रयत्न
पिंपरी – महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा 82 लाखांच्या वह्या खरेदीचा डाव विखुरल्यानंतर आता मंडळाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी नवा घाट घातला आहे. शैक्षणिक वर्ष संपत आल्यानंतर विद्यार्थ्यांना “वॉटर बॉटल’ देण्याचा विषय अंतिम टप्प्यात आणला असून त्यापोटी अडीच कोटी रुपयांची उधळण ठेकेदारावर करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणे मंडळातील वादग्रस्त ठरलेल्या ठेकदाराला डोळ्यासमोर ठेवून ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी केले जाते. साहित्य पुरवठ्यामध्ये काही ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी आहे. तर मंडळातील अधिकारीही याच ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून त्यांना अपेक्षित असलेल्या अटी व शर्तीनुसार निविदा प्रक्रिया राबवित असल्याचे वारंवार समोर आले आहे. महिनाभरापूर्वी ज्या ठेकेदाराची चौकशी सुरू आहे त्याच ठेकेदाराला थेट पद्धतीने तब्बल 82 लाखांच्या वह्या पुरविण्याचा ठेका देण्याचा घाट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घातला होता. हा विषय वादग्रस्त ठरल्याने तसेच भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने थंड बस्त्यामध्ये टाकण्यात आला.
वह्यांचा डाव उधळला गेल्यानंतर तसेच या विषयावरून शिक्षण मंडळाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला असतानाच तब्बल अडीच कोटींच्या “वॉटर बॉटल’ खरेदी करण्याचा विषय समोर आणला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टील आणि कॉपरच्या वॉटर बॉटल देण्यात येणार आहेत. त्यापोटी अडीच कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे वॉटर बॉटल खरेदी करावयाच्या शीर्षकाखाली एवढी रक्कमही शिल्लक नसताना हा विषय पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. वॉटर बॉटल पुरविण्याची मागणी कोणीही केलेली नसताना मंडळाच्या अधिकारी, पदाधिकारी आणि ठेकेदाराचे “भले’ करण्यासाठी आखण्यात आलेला हा “घाट’ सत्ताधारी व आयुक्त उधळून लावणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांच्या नावाखाली लूट?
महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरविल्या जातात. या सुविधा पुरविण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची खरेदी केली जाते. आर्थिक हितसंबंधाची “जाण’ ठेवत ठेकेदारही पुरवठा करतात. यातून मोठ्या प्रमाणात पालिकेची लूट सुरू असल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. मात्र मंडळाच्या कारभारात कोणताच फरक झालेला नाही. या खरेदीला आणि संबंधित ठेकेदाराला पालिकेच्या चौथ्या मजल्यावरील एका अधिकाऱ्याचाही आशीर्वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.
खरेदीला विरोध करणार – सावळे
शिक्षण मंडळामध्ये वॉटर बॉटल खरेदी करण्याचा निर्णय हा अत्यंत चुकीचा असून शैक्षणिक वर्ष संपत आल्यानंतर हा निर्णय केवळ ठेकेदार पोसण्यासाठी घेतला आहे. या निर्णयाला आमचा विरोध असून चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या उधळपट्टीचा विषय हाणून पाडू, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी व्यक्त केली. याबाबत आयुक्तांना निवेदन देणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
वारंवार फोन करूनही उत्तर नाही
शिक्षण मंडळातील शिक्षणाधिकारी ज्योत्सना शिंदे यांची प्रतिक्रीया घेण्यासाठी वारंवार फोन केल्यानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पुण्यात बैठक असल्याने शिंदे या शुक्रवारी महापालिकेकडे फिरकल्या नाहीत. तर माध्यमिक शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.