कोविद-2019 व्हायरसच्या भीतीने खरेदी मंदावली
भाटघर -चीनमध्ये कोविद-2019 व्हायरस पसरल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिकनमध्ये हा व्हायरस असल्याची अफवा समाज माध्यमांद्वारे पसरत असल्याने याचा परिणाम चिकनच्या विक्रीवर झालेला दिसून येत असून, भोर तालुक्यातील चिकन सेंटरवर ग्राहकच नसल्याने येथे शुकशुकाट दिसून येत आहे.
कोविद-2019 व्हायरसच्या भीतीमुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
समाज माध्यमांमधून या व्हायरसबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत, त्यात कोंबड्यांमुळे या आजाराची लागण होत असल्याचेही म्हटले आहे, त्यामुळे या व्हायरसच्या भीतीने चिकनसाठी असलेली मागणी घटली असून, पोल्ट्री व्यवसायायीक अडचणीत सापडले आहेत. समाज माध्यमांद्वारे कोविद-2019 बाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याने अनेक व्यवसाय अडचणीत येत आहेत. भोर तालुक्यात औद्योगिक कंपन्यांचा अभाव असल्याने काही तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळले आहेत.
पोल्ट्रीतील जिवंत पक्ष्यांचा विक्रीस येईपर्यंत किलोला 70 रुपयांच्या दरम्यान दर आहे; परंतु या व्हायरसमुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाल्याने जिवंत कोंबडीचे होलसेल दर गडगडले असून, 35 ते 40 रुपये किलोच्या दरम्यान झाला आहे. यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले असून, या व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान होणार आहे. कोविद-2019 व्हायरसचा कोणताही परिणाम चिकन खाल्ल्याने होणार नसल्याची माहिती पोल्ट्री व्यवसायिक नाना पवार यांनी दिली आहे.
गेल्या महिन्यात आमचा चिकन सेंटरचा धंदा तेजीत होता; परंतु कोविद-2019 व्हायरसची अफवा पसरल्याने चिकन सेंटरवर ग्राहक फिरकतही नसल्यामुळे चिकन सेंटरबंद करण्याची वेळ आली आहे.
-अक्षय पवार, चिकनसेंटर व्यवसायिक, माळवाडी, ता.भोर