पुणे – गेल्या 20 ते 25 वर्षांपासून चर्चेत असलेला पुणे-नाशिक रेल्वे मार्ग लवकरच मार्गी लागणार असून या महिन्यात किंवा मार्च महिन्यात या मार्गासाठी भूमिअधिग्रहण व निविदा काढली जाण्याची शक्यता असल्याने पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प “ट्रॅक’वर येण्याची चिन्हे गडद झाली आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून सुमारे 1200 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
पुणे-नाशिक रेल्वेसाठी 2004मध्ये तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी सर्वसाधारण जो सर्वे काढला होता, त्यावेळी अंदाजे खर्च 900 कोटी काढण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षांनी हा खर्च 1800 कोटी मग अडीच हजार कोटी, मग साडेतीन हजार कोटी मग तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे आढळराव पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केल्यावर त्यांनी रेल्वे मार्गास हिरवा कंदील दाखवला व त्यावेळी अपेक्षित खर्च हा साडेपाच हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
अपेक्षित खर्च ठरल्यानंतर राज्य सरकार व मध्य रेल्वेच्या भागीदारीत कंपनी सुरू करून हा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्याचे ठरले. त्याबाबतची घोषणाही प्रभू यांनी केली. दरम्यान, तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकालात जे काही झाले तो फक्त हवेतील गोळीबार ठरला होता. त्यामुळे या प्रोजेक्टला खऱ्या अर्धाने प्रभू यांच्या 2015-16च्या कार्यकाळात सुरूवात झाली.
हायस्पीड रेल्वे मार्ग दृष्टिक्षेप
- एकूण मार्ग 231.761 किमी लांबीचा असणार
- पुणे-नाशिक या हायस्पीड रेल्वेमार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून 1200 हेक्टर जमिनीचे संपादन
- 20.62 किमी लांबीचे एकूण 12 बोगदे बांधणार
- नद्यांवर 15 पुलांचे बांधकाम
- सात रेल्वे उड्डाणपूल, जवळपास 150 छोटे पूल, 31 दरीपूल, 170 ठिकणी मोरी (कल्व्हर्ट), 18 ठिकाणी मोठे
- भुयारी मार्ग, 99 छोटे भुयारी मार्ग
- 21 ठिकाणी रस्ते क्रॉसिंग होणार, 11 जागी कॅनॉल क्रॉसिंग
16 हजार कोटी रुपयांवर गेला खर्च – आढळराव पाटील
2004मध्ये हा प्रोजेक्ट कागदावर आला असला तरी 2015-16च्या काळात त्याला गती मिळाली. त्यामुळे त्या आधीपर्यंत हा प्रोजेक्ट फक्त कागदावरच होता. दरम्यान, 2004मध्ये अंजाचे नऊशे कोटी रुपये खर्च अपेक्षित होता; मात्र त्यानंतर वेगवेळ्या सर्वेक्षणानंतर प्रकल्पाचा खर्च वाढत गेला.
दरम्यान, हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सांभाळत असून त्यांच्याकडून प्राप्त झालेला संपूर्ण प्रकल्पाचा अहवाल राज्य सरकार व रेल्वे मंत्रालयाकडे गेलेला आहे. आता पुणे-नाशिक 2 तासांत पार होणार असल्याने “हायस्पीड’ रेल्वे या मार्गावर धावणार आहे.
त्यासाठी 13 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे; मात्र प्रकल्प सुरू झाल्यानंतर तो पूर्णत्वास येण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कार्यकाल लोटला जाईल. त्यामुळे या प्रकल्पाला भूमिअधिग्रहणधरून 16 हजार कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. अशी माहिती माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
असा आहे मार्ग
पुणे, हडपसर, वाघोली, कोलवडी, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जबुत, साकूर, अंबोरे, संगमनेर, देवठाण, दोडी, सिन्नर, मुढारी, शिंदे आणि नाशिक रोड असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला आहे.