महाकाय खड्ड्यांमुळे वाहनचालक मेटाकुटीस; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सातारा – मोळाचा ओढा ते बुधवार नाका या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र, हे काम पुन्हा बंद पडल्याने वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाकाय खड्ड्यांमुळे वाहनचालक मेटाकुटीस आले असून बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
मोळाचा ओढा ते बुधवार नाका या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ही समस्या “जैसे थे’ आहे. या रस्त्यावरील मोठे मोठे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिलांना वाहन चालवताना अनेक कसरतींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याबाबत दै. “प्रभात’ने आवाज उठवला होता. त्यानंतर मोळाचा ओढा येथून कामास सुरुवातही करण्यात आली.
दोन दिवस काम झाले मात्र सुमारे शंभर मीटर अंतरच रस्त्याची दुरुस्ती झाली. बंद पडलेले काम आज सुरु होईल, उद्या सुरु होईल, अशी अपेक्षा वाहनचालक व परिसरातील नागरिकांना होती. मात्र, आठ दिवस उलटून गेले तरी बंद पडलेले काम अद्याप सुरु झाले नाही. विशेषत- आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालापासून बुधवार नाक्यापर्यंत रस्त्याची स्थिती जीवघेणी आहे.
मोळाचा ओढा ते बुधवार नाका या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. पुण्याकडून जुन्या हायवेवरुन व मेढ्याकडून येणारी वाहने याच रस्त्याने सातारा शहरात प्रवेश करतात. मात्र, हाच रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने मोठी समस्या बनली आहे. मध्यंतरी हा रस्ता खोदण्यात आला होता. यावेळी मोठमोठी चेंबर रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच असल्याने अनेक वाहने या चेंबरला घासून नुकसान होत आहे. बांधकाम विभागाने याबाबत पुढाकार घेवून तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.