राज्यस्तरीय अभ्यासगटांच्या समितीत विविध विषयांवर चर्चा
शिक्षक संघटनांची मागणी : पुणे जिल्हा परिषदेत बैठक
पुणे – राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या या ऑनलाइन पद्धतीनेच केल्या जाव्यात. मात्र, या संदर्भात असलेल्या नियमावलीत काही बदल करण्यात यावेत, अशी मागणी राज्यातील शिक्षक संघटनांनी केली आहे. प्रवर्ग 1, रोस्टर पद्धतीत बदल, पती-पत्नी एकत्रीकरण आणि अवघड शाळांच्या नियमावलीत बदल करण्याच्या सूचना शिक्षक संघटनांनी केल्या. जवळपास 50 विषयांवर चर्चा यावेळी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्या संगणकीय बदली प्रक्रियेचा अभ्यास करून त्यात काही सुधारणा करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अभ्यासगटांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची पहिली सभा सोमवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. राज्यातून जवळपास 40 ते 48 शिक्षकांच्या संघटनांचे अध्यक्ष आणि सचिव या बैठकीस उपस्थित होते.
2017 पासून शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांना सुरुवात झाली. या प्रक्रियेच्या नियमांना अनेक शिक्षकांच्या विरोध आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत शिक्षक संघटनांनी ऑनलाइन पद्धत कायम ठेवण्यास एकमुखी पाठिंबा दिला. मात्र, नियमावलीत बदल करण्याच्या सूचना केल्या. प्रवर्ग-1 वरून काही काळ बैठकीत तणावाचे वातावरण झाले. प्रवर्गात कुणाला समाविष्ट करावे यावर एकमत न झाल्याने आयुष प्रसाद यांनी अभ्यासगट स्थापन करून त्या संदर्भात संघटनांनी सूचना करण्यास सांगितले. पती-पती एकत्रीकरणासाठी 30 किलोमीटर अंतराच्या निकषामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुगल मॅपवरून अंतर मोजायचे की बसस्थानकावरून अंतर मोजायचे असे प्रश्न उपस्थित करण्यात आला असून, त्यापैकी कुठलीही सोयीची पद्धत स्वीकरण्याच्या सूचना करण्यात आल्या.