‘व्हॅलेंटाईन वीक’च्या निमित्ताने सोशल मीडियावर पोलिसांकडूनही संकल्पनेचा आधार
– कल्याणी फडके
पुणे – “व्हॅलेंटाईन वीक’च्या निमित्ताने विविध “डे’ज साजरे करण्याकडे तरुणाईचा कल असतो. आता पुणे पोलिसांकडूनही या संकल्पनेचा आधार घेतला जात आहे. विविध “डे’जच्या अनुषंगाने सुरक्षाविषयक जनजागृती केली जात आहे.
फेब्रुवारीमध्ये “व्हॅलेंटाईन वीक’ साजरा करण्यात येतो. या वीकमधील “डे’ज सोशल मीडियावर “ट्रेन्डींग’ असतात. यामध्ये सहभाग घेत “महाराष्ट्र पोलीस’, “पुणे पोलीस’ या “ट्वीटर हॅन्डल’वरून देण्यात येणारे प्रबोधनात्मक संदेश “नेटीझन्स’मध्ये चर्चेचा विषय ठरत असून, हजारो “युझर्स’ हे संदेश “रिट्वीट’ करत आहेत. सध्या, सोशल मीडियावर चालू घडामोडींवर आधारित “ट्रेन्ड’ व्हायरल होतो. या “ट्रेन्डींग’ गोष्टींचा आधार आता पुणे पोलिसांनी घेतला आहे. “डे’जच्या संकल्पनेला अनुसरून पुणे पोलीस “ट्वीटर’वरून प्रबोधन करण्यात येत आहे. मागील अनेक महिन्यांपासून पुणे पोलिसांकडून मजेशीर “ट्वीट’ करण्यात येत आहे. “इन्स्टंट रिस्पॉन्स’मुळे पोलिसांच्या “ट्वीट’बाबत औत्सुक्य निर्माण होत आहे.
“ट्वीटर’, “फेसबुक’, “व्हॉटसऍप’, “इन्स्टाग्राम’ आदी सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या आधुनिक बदलाचा स्वीकार मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांसह आता शासकीय यंत्रणांनी केला आहे. गुन्ह्यांचा छडा लावण्यामध्ये अग्रेसर असणारा पोलीस विभाग आता ट्वीटर वापरामध्ये अग्रेसर ठरत आहे. याला पोलीस आयुक्तांसह उच्च पदस्थ अधिकारीदेखील अपवाद नाहीत.
प्रपोझ डे
“प्रपोझ डे’ला आयुष्याचा जोडीदार शोधा, गुन्हेगारीतला भागीदार नाही’ आणि “पुणेकरांनो, तुम्ही वायफाय आहात का? आम्हांला तुमच्याशी फार स्ट्रॉंग कनेक्शन जाणवतं’
चॉकलेट डे
“प्रथम संमती; नंतर चॉकलेट, कारण सर्वांना हे आवडत नाही’
टेडी डे
“टेडी बेअर क्युट असतात. त्यात काही वादच नाही. पण, अनोळखी असुरक्षित नाही तर धोकादायक असू शकतात. आपल्याला कुठेही असे काही आढळल्यास आम्हाला कळवा’
प्रॉमिस डे
“तुम्ही ट्रॅफिकचे नियम पाळले तर आम्ही चलन नाही भरून घेणार, प्रॉमिस…..’
अनोख्या “रोझ डे’ला शेकडो “लाईक्स’…
वाहतूक शाखेने नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांना गुलाब देत “रोझ डे’ साजरा केला होता. याचे फोटो पुणे पोलिसांनी “ट्वीट’ करत “रोज डे’चे कॅप्शन देत “अपलोड’ केला होता. या ट्वीटला 500 हून अधिक जणांनी “लाईक’ केले असून, अनेकांनी हे “रिट्वीट’देखील केले आहे.
एका युझरला हेल्मेट भेट…
एका युझरला पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते हेल्मेट भेट देण्यात आले. याचा फोटो सोमवारी “ट्वीट’ करण्यात आला. या फोटोला पोलिसांनी “टेडी बेअरपेक्षा हेल्मेट एक चांगलं गिफ्ट आहे, नाही का ?’ असे कॅप्शन दिले होते.