श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दहशतवादी संघटनांचे 5 भूमिगत कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघ्टनेचे एक मोड्युल उद्ध्वस्त केले. हे मोड्युल बडगाम जिल्ह्यातील चंदूरा इथे सक्रिय होते. या मोड्युलमध्ये तीन भूमिगत कार्यकर्ते सक्रिय होते, त्यांना अटक करण्यात आली आहे.
अमीर शफी डार, शबीर अहमद गॅनी आणि मुदासिर अहमद खान अशी या तिघांची नावे आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे तिघेही गेल्या काही महिन्यांपासून या क्षेत्रात सक्रिय होते. ते दहशतवाद्यांना आश्रय तसेच शस्त्रांस्त्रे मिळवून देत होते. याशिवाय विविध विध्वंसक कार्यातही ते सहभागी होते, असे ते म्हणाले.
आणखी एका कारवाईत सुरक्षा दलाने बांदीपोरा जिल्ह्यातील हाजिन परिसरातून दोन भूमिगत कार्यकर्त्यांना पकडले. अटक करण्यात आलेले इरफान अजीज भट आणि मोहम्मद असिफ पर्रे हे लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हाजिन आणि लगतच्या भागात धमकी देणारी पोस्टर्स चिकटविण्यामागे ते होते. पोस्टरच्या छपाईसाठी वापरलेला लॅपटॉप व प्रिंटर जप्त करण्यात आला आहे.