काम प्रलंबित; नागरिकांना प्रतीक्षा कायम
पिंपरी – आकुर्डी येथे महापालिकेच्या वतीने नव्याने उभारल्या जात असलेल्या मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचे काम निश्चित मुदतीनंतरही अपूर्ण आहे. मुदत पूर्ण होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही काम मात्र पूर्ण झालेले नाही. हे काम सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तरी, हे काम लवकरात लवकर पूर्ण करून तातडीने रूग्णालय सुरू करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. संबंधित रूग्णालय सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांची जवळच चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळू शकणार आहेत.
आकुर्डी येथे सध्या महापालिकेचे 22 खाटांचे रुग्णालय सुरू आहे. महिला प्रसूतीगृह व बाह्यरूग्ण विभागाची तेथे सुविधा आहे. प्राधिकरण, आकुर्डी, निगडी आदी परिसरातील नागरिक येथे उपचारासाठी येतात. संबंधित रूग्णालयात महिला प्रसूती शस्त्रक्रिया, पुरूष नसबंदी, कुटुंबकल्याण कार्यक्रम, जन्म-मृत्यू नोंदणी, लसीकरण आदी प्रमुख सुविधा आहेत.
संबंधित रूग्णालयाची जागा अपुरी आहे. रुग्णालयामध्ये दंतोपचार, डोळे, नाक, कान, घसा, हाडाच्या विकारांवरील उपचार, अतिदक्षता आणि बालकांसाठीचा अतिदक्षता विभाग, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एमआरआय, एक्सरे, पुरूष आणि बालकांसाठी स्वतंत्र विभाग आदी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्याशिवाय, वाहनांना पार्किंगसाठी देखील अपुरी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन रूग्णालय इमारत लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून जोर पकडू लागली आहे.
नवीन रूग्णालयात विविध सुविधा
आकुर्डीतील चर्चजवळील जागेत नवीन रूग्णालयाच्या पाच मजली इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी 8 जुलै 2019 पर्यंत मुदत दिलेली होती. मात्र, संबंधित मुदतीत रूग्णालयाचे काम पूर्ण झालेले नाही. नवीन इमारतीत 108 खाटांचे रुग्णालय होणार आहे. त्यामध्ये बाह्यरूग्ण विभाग, तपासणी कक्ष, क्ष किरण तपासणी, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृह, उपहारगृह, चोवीस तास औषधालय, शस्त्रक्रिया कक्ष, पुरूष व महिलांचा मेडीकल वॉर्ड, अतिदक्षता विभाग, सर्जिकल विभाग, पॅथॉलॉजी लॅब, प्रसूतीगृह व नवजात शिशूंचा विभाग आदी प्रमुख वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत.
डॉक्टरांची गरज भासणार
आकुर्डीतील महापालिकेच्या सध्या सुरू असलेल्या रूग्णालयात 1 ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि 4 वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी तत्त्वावर कार्यरत आहे. त्याशिवाय, 1 बालरोग तज्ज्ञ, 1 स्त्री रोग तज्ज्ञ, 1 भूलतज्ज्ञ, 2 निवासी वैद्यकीय अधिकारी, 1 फिजिशियन आणि 1 वैद्यकीय अधिकारी मानधन तत्त्वावर काम करीत आहेत. नवीन रूग्णालयांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. त्याबाबत आकुर्डी रूग्णालय प्रशासनाकडून आवश्यक मनुष्यबळाची मागणी करण्यात आलेली आहे.