पेठ : लहान मोठ्या व्यक्तींचे वाढदिवस साजरे होताना आपण पहिले असतील, पण तुम्ही कधी गायीचा वाढदिवस साजरा होताना पहिला क? नाही ना! तर मग हि बातमी वाचा. पेठ तालुक्यातील सणस वस्तीत चक्क एका गायीचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. शेतकरी कोंडाजी सणस यांनी आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे राधा गायीचा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला.
आपला स्वतःचा किंवा घरातील कुठल्याही सदस्यांचा वाढदिवस साजरा करणे हे आता नवीन नाही. आपल्या पाळीव प्राण्यांचे पालनपोषण करणारे आणि त्याला घरातील सदस्याइतके महत्व देणारेही पहिले असतील. मांजर, कुत्रे या पाळीव प्राण्यांचे वाढदिवस साजरे करणारे आहेत. मात्र, गायीचा वाढदिवस साजरा करणारे विरळच!
गोपालक कोंडाजी सणस यांच्याकडे तामिळनाडू, आंध्रप्रदेश भागात आढळून येणारी पुंगनूर या जातीची गाय आहे. गायी घरी आल्यानंतर सणस यांच्या आर्थिक परिस्थिती मध्ये वाढ झाली. अनेक प्रदर्शनामध्ये गायीला पारितोषिके मिळाली आहे. या गायी बद्दल अनेक गोपालक संस्था त्यांच्याकडून माहिती घेतात.
बारामती येथील प्रदर्शनामध्ये खुद्द पवार कुटुंबातील सदस्यानी गायीबद्दल चौकशी केली होती. गाय अत्यंत देखणी, रुबाबदार, असुन सणस यांच्या स्कॉर्पिओ गाडी मध्ये स्वतः जाऊन बसते. किर्तन चालू असताना हि गाय कीर्तन संपेपर्यंत माणसामध्ये उभी राहते. या गायीचा आज चौथा वाढदिवस आहे, त्यानिमित्त गायीला सजवून मिरवणूक काढण्यात आली, आणि वाढदिवसाचा केकही कापण्यात आला.
पुंगनूर या जातीच्या गायीपासुन निघणाऱ्या दुधात औषधी गुणधर्म असतात. या जातीच्या गायीचे दुध तिरुपती बालाजीला अभिषेक घालण्यासाठी वापरले जाते. तसेच या गायीच्या तुपाचा वापर हा प्रसादा मध्ये केला जातो.