जुन्नर – ऑनलाइन विक्री करणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या कार्यालयातून 4 लाख 22 हजार 992 रुपयांची रोख रक्कम तिजोरीतून चोरट्याने लंपास केल्याची घटना जुन्नर शहरात घडली आहे.
शहरातील ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने विक्री केलेल्या पार्सलची जमा झालेली रक्कम शहरातील गजबजलेल्या सराई पेठेतील कार्यालयातून सायंकाळच्या सुमारास लांबविल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेबाबत ऑनलाइन कंपनीची रक्कम ऑनलाईन पद्धतीने लंपास अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.
याबाबत इस्टा कार्ड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुपरवायझर गणेश कोकणे यांनी जुन्नर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या घटनेत तिजोरीचे कुलूप चावीने उघडून अज्ञात चोरट्याने चोरी केली असून सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पहाणी केली आहे. पुढील तपास जुन्नरचे पोलीस उपनिरीक्षक बेदरे करत आहेत.