नवी दिल्ली : भाजपाचे नेते जे. पी. नड्डा यांच्याकडे आज भाजपाचे सर्वोच्च पद आले आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. लोप्रोफाइल असलेले आणि वादग्रस्त वक्त्यांपासून दूरच राहणारे अतिशय प्रभावी नेते, अशी नड्डांची ओळख आहे. जे.पी. नड्डा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवकही आहेत.
या संघटनेशी असलेली घट्ट नाळ त्यांना भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होताना कामी आली. पाटणा येथे एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले जे.पी. नड्डा हे विद्यार्थीदशेत असताना जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतही सहभागी झाले होते. हिमाचल प्रदेशात शिक्षण घेताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते.
1984 मध्ये स्टुंडट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा पराभव अभाविपने केला होता. त्यानंतर हिमाचल प्रदेशात पहिल्यांदा विद्यार्थी युनियनचे अध्यक्षपद जे. पी नड्डा यांनी भुषवले होते. 1986 पासून नड्डा राजकारणामध्ये सक्रिय आहेत.
मग 1993मध्ये पहिल्यांदा ते हिमाचल प्रदेशमधून आमदार झाले. ते तीन वेळा भाजपच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशातून आमदार झाले.
1993 ते 98, 1998 ते 2003 आणि 2007 ते 2012 पर्यंत ते आमदार होते. तसेच 1994 ते 98 दरम्यान ते हिमाचल प्रदेश भाजपच्या विधिमंडळाचे नेते होते. 2008मध्ये धूमल यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यापासून नड्डा यांच्या राजकीय प्रगतीचा आलेख उंचावत गेला. त्यानंतर जे.पी. नड्डा यांनी 2010मध्ये राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला.
त्यावेळी नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष होते. गडकरींनी त्यावेळी नड्डांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली होती. यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. पक्षात चर्चेत असलेल्या नड्डा यांना 2014मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होताच कॅबिनेट मंत्री केले.
2019च्या लोकसभा निवडणुकीत नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी होती. नड्डांनी पक्ष संघटना बळकट करत उत्तर प्रदेशात 62 जागा जिंकून दिल्या. यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्याने नड्डांचे पक्षातील महत्त्व वाढले. यावेळी भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शहा केंद्रीय गृहमंत्री झाल्याने पक्षाचे कामकाज कोण पाहणार? असा प्रश्न उपस्थित झाला. पुन्हा एकदा मोदींनी नड्डांवर पक्षाची जबाबदारी सोपवली. जुलै 2019मध्ये आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झाले.