मकरसंक्रांतीनिमित्त देवस्थान ट्रस्ट व मोरगाव ग्रामपंचायतीकडून उपक्रम
मोरगाव – ओवसायला सुगडी-बोळकी ।।
माहेरवासनिला साडी – लुगडी ।।
जमलं तर चुडा-बांगडी ।।
नाही तर सोबतीला तिळगुळाची गोडी ।। याप्रमाणे अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव (ता. बारामती) येथील मयुरेश्वर मंदिरात बुधवारी (दि.15 रोजी) मकरसंक्रांतीसणानिमित्त सुमारे पन्नास हजारांहून अधिक महिलांनी मयुरेश्वराचे पूजन करत दर्शनाचा लाभ घेतला.
मकर संक्रांतीसणानिमित्त ओवसण्यासाठी मयुरेश्वरनगरीत महिलांची अलोट गर्दी लोटली होती. या सणानिमित्त गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याने देवस्थान ट्रस्ट व मोरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती.
मोरगाव येथील मयूरेश्वर मंदिरात काल मकर संक्रांतीनिमित्त महिलांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. मंदिरातील श्री गणेशाच्या पत्नी सिद्धी व बुद्धीच्या मूर्ती औक्षण करण्यासाठी खास मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याततून बाहेर ठेवण्यात आल्या होत्या.
भोगी व संक्रांत असल्याने ही पूजनाची संधी महिला भाविकांना असल्याने मोठ्या प्रमाणात त्यांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वत्र मोठ्या उत्साहात संक्रातीची धामधूम सुरू होती.
मंदिराच्या आवारात ओवसण्यासाठी असलेले हळदी कुंकू, ऊस, गाजर, बोरे , हरभरा ,ज्वारीचा हुरडा, भुईमूग व घेवड्याच्या शेंगा तसेच गव्हाची ओंबी पसरलेले पाहावयास मिळाले. काल दिवसभर मयुरेश्वरनगरीत ओवसण्यासाठी महिलांचे समूह पाहावयास मिळत होते. रात्री सूर्यास्तानंतर उशिरा सुवासिनींच्या सौभाग्याचे लेन असलेले हळदी कुंकू पानाचा विडा देऊन महिलांनी हा सण मोठ्या उत्साहात
साजरा केला.