भाजप नेते स्वामींचा अनोखा सल्ला
भोपाळ : भारतीय रूपया मजबूत करायचा असल्यास नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापा, असा अनोखा सल्ला भाजपचे नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी दिला आहे. राज्यसभेचे सदस्य असणाऱ्या स्वामी यांचे मंगळवारी रात्री मध्यप्रदेशच्या खंडवामध्ये भाषण झाले.
त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठून इंडोनेशियाच्या चलनावर भगवान गणेशाचे छायाचित्र असल्याकडे लक्ष वेधले. उत्तरादाखल स्वामी म्हणाले, त्या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात. माझे त्याला समर्थन आहे. भगवान गणेश विघ्नहर्ता आहेत.
अर्थात, भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी आपल्या नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापले जावे. त्यामुळे कुणाला वाईट वाटणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. नागरिकत्व दुरूस्ती कायद्यात (का) काहीच आक्षेपार्ह नाही. कॉंग्रेस आणि महात्मा गांधींनीही का चे समर्थन केले होते.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही 2003 मध्ये संसदेत का आणण्याची विनंती केली होती, अशी भूमिका स्वामी यांनी मांडली. त्याआधी एका व्याख्यानावेळी स्वामी यांनी भाजपकडून लवकरच समान नागरी कायदा आणला जाणार असल्याचा दावा केला.