कोपरगावकरांना स्नेहलता कोल्हे यांचा सवाल
कोपरगाव – शहरातील नगरपालिका, सार्वजनिक वाचनालय, बंदिस्त नाट्यगृह, बाजार ओटे, गोकुळनगरी पूल, पोलीस ठाणे, पंचायत समिती या शासकीय इमारतीसह निळवंडे बंदिस्त पाईपलाईन योजना, रस्ते, शौचालय, पंतप्रधान आवास योजना, शहर पाणी योजनेला अतिरिक्त साडे सात कोटी असा एकत्रित मिळून 46 कोटी रुपयांचा निधी केवळ शहर विकासासाठी आणला. यापूर्वीचे आमदार कधीच एवढा मोठा निधी शहरासाठी आणू शकले नाही. तो मी मिळवून दिला. त्यामुळे विकासाच्या कामी मी कुठे कमी पडले, असा सवाल कोपरगावकरांना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला.
शहरात सुरु असलेल्या विविध शासकीय तसेच पालिक इमारतींच्या बांधकामाची पाहणी कोल्हे यांनी करून कामांचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना कामांना गती देवून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. पाहणी केल्यानंतर त्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, निवडणूक दरम्यान विरोधकांनी माझ्याविरुद्ध आरोपांची राळ उठवली. समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराच्या नावाने पाच नंबर तळ्यावरून मतदारांना खेळवत ठेवले. नगरपालिकेने प्रस्ताव तयार केला नाही.
शहराला पाच नंबर तळ्याप्रश्नी झुलवत ठेवले. दुसरीकडे निळवंडे पाईपलाईन विरोधात न्यायालयाची दरवाजे ठोठावले, शेतकऱ्यांना भडकावून देऊन निवडणुकीत राजकीय पोळी भाजली. निवडणूक झाल्यावर शहरातील सर्व प्रश्न संपल्याच्या अविर्भावात सर्व जण शांत झाले. निवडणूक दरम्यान माझ्या विरोधात एक स्वतंत्र टोळीच कार्यरत होती, असा आरोप कोल्हे यांनी केला.
शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला, मात्र त्याचा वेळेत पुरेपूर वापर केला गेला नाही. कामे अजूनही ठप्प आहे. कोल्हेंचा शहर विकासाच्या कामाला विरोध करतात, अशी ओरड केली जात असून असे जर असते तर एवढा मोठा निधी मी मंत्रालयाच्या धडाका घेऊन आणलाच नसता. आणलेला निधीचे योग्य वापर झाला नाही.
यासाठी सत्ताधारी नगरसेवक देखील कमी पडली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शहरासह तालुक्याला कोट्यवधी रुपयांचा निधी आणून देखील निवडणुकीत माझ्या नावाने शिमगा केला गेला. नुसते मंत्र्यांना निवेदन देऊन विकास कामे मंजूर होत नाही. त्यासाठी कामाचा झपाटा लागतो. पालिका इमारतीसाठी पुढील निधी आता विद्यमान आमदारांनी आणावा, असा आव्हान त्यांनी दिले.
यावेळी कोल्हे यांच्या समवेत उपनगराध्यक्ष योगेश बागुल, नगरसेवक विजय वाजे, कैलास जाधव, सत्येन मुंदडा, स्वप्नील निखाडे, शिवाजी खांडेकर, कैलास खैरे, बबलू वाणी, विनोद राक्षे, दिनेश कांबळे, नारायण अग्रवाल, बाळासाहेब आढाव, आरिफ कुरेशी, पिंकी चोपडा, पालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोरडे, अभियंता दिगंबर वाघ, एसटी महामंडळाचे प्रकल्प अभियंता नमन शेट्टी, विभागीय अधिकारी शीतल शिंदे, कनिष्ट अभियंता संजय दरेकर, ठेकेदार के. के. थोरात, अप्पा महाले, कुणाल सोनावणे आदि उपस्थित होते.