मुंबई : मोठ्या विलंबानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला उद्याचा मुहुर्त मिळाला आहे. उद्या होणारा हा विस्तार पुर्ण स्वरूपाचा असेल. त्यात प्रत्येक पक्षाच्या वाट्याला जी खाती आली आहेत त्यात एकही खाते रिक्त ठेवले जाणार नाही असे सांगण्यात येते.
उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे तेरा मंत्री शपथ घेतील त्यात दहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री असतील तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचेही तेरा मंत्री शपथ घेतील त्यात दहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री असतील.
कॉंग्रेसचे दहा जण शपथ घेतील त्यात आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री असतील असे सांगण्यात येते.
उद्या जे मंत्री शपथ घेणार आहेत त्याची संभाव्य यादी माध्यमांमध्ये चर्चीली गेली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यादीत अजित पवार, दिलीप वळसेपाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, धनंजय मुंडे, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अदिती तटकरे, डॉ किरण लहामटे यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये अनिल परब, सुनील राऊत, उदय सामंत, शंभुराजे देसाई, प्रकाश अबिटकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड, प्रताप सरनाईक, दादा भुसे, गुलाबराव पाटील ही नावे चर्चेत आहेत.
कॉंग्रेसच्या यादीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव नसेल असे सांगण्यात येते. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मात्र मंत्रिपद निश्चीत मानले जात आहे.
अन्य मंत्र्यांमध्ये के. सी. पाडवी, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजीत कदम, संग्राम थोपटे, विजय वडवेट्टीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड किंवा अमिन पटेल ही नावे चर्चेत आहेत.
मित्र पक्षांच्या नावांविषयीचा संभ्रम अजून दूर झालेला नाही. समाजवादी पार्टी, राजु शेट्टी यांची स्वाभीमानी संघटना इत्यादी पक्षांनाही या मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व हवे आहे. पण त्याविषयी नेमका काय निर्णय घेण्यात आला आहे हे उद्याच्या विस्ताराच्यावेळीच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत 28 नोव्हेंबरला सहा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यामध्ये शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा समावेश होता.
त्यानंतर महिनाभर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. राज्याच्या मंत्रिमंडळात जास्ती जास्त 43 मंत्री शपथ घेऊ शकतात. आता मुख्यमंत्र्यांसह 7 जणांनी शपथ घेतल्यानं आणखी 36 जण शपथ घेऊ शकतात.