सोनिपत – “सुपर मॉम’ हा शब्द आजकाल खेळात अगदी सहज उच्चारला जातो. मात्र, 15 ते 20 वर्षांपूर्वी मुलांच्या जन्मानंतर पुन्हा मैदानावर पराक्रम गाजवणं, कधीच सोपं नव्हतं. म्हणूनच दोन मुलांच्या जन्मानंतर पुन्हा हॉकी मैदानात उतरुन आणि नंतर स्वत:ची हॉकी अकादमी स्थापन करणं, हेच प्रितम रानीचं जिवितध्येय बनलं आहे. सध्या तिच्या हॉकी अकादमीमध्ये उद्याच्या महिला हॉकीपटू घडताना दिसत आहेत.
प्रीतम ही अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिलीच महिला हॉकीपटू. प्रीतमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने तब्बल 16 वर्षांनंतर आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मुलाच्या जन्मानंतर प्रीतम स्वत:बद्दल थोडी साशंक होती. पण तिने काही दिवसातच स्वत:ला सावरलं. वर्ष 2000 मध्ये ती आंतर रेल्वे स्पर्धेत सहभागी झाली. या स्पर्धेत तिने चांगली कामगिरी केली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रीतमने नऊ गोल केले. प्रीतमची शारीरिक क्षमता, वेगवान हालचाली, जोर तसूभरही कमी झाला नव्हता. ती नव्या जोशात हॉकीच्या मैदानात उतरली होती. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर तीन वर्षांनी ती भारतीय संघाचा भाग होती. 2002 मध्ये इंग्लंडमधल्या मॅंचेस्टरमध्ये झालेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावलं. प्रीतम त्या संघाचीही प्रतिनिधी होती.
राष्ट्रकूल स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावल्यानंतर दोन वर्षांनी प्रीतमने सोनीपतमध्ये प्रीतम रानी हॉकी अकादमीची स्थापना केली. आजवर केलेला संघर्ष पाहता आई झाल्यानंतर हॉकीच्या मैदानात उतरणं प्रीतमसाठी फार कठीण नव्हतं. गुरुग्राममधल्या झारसा गावातल्या शेतकऱ्याची मुलगी असणाऱ्या प्रीतमला आर्थिक अडचणींसोबतच सामाजिक विरोधालाही सामोरं जावं लागलं होतं. पण कोणत्याही विरोधाला न जुमानता ती हॉकीपटू बनली. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर 2006 मध्ये ती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळली. वर्ष 2008 मध्ये तिला ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी बोलावण्यात आलं होतं. सध्या ती आपल्या अकादमीचा कारभार सांभाळते आहे. आपल्यासारख्या असंख्य मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देण्याचं काम तिला करायचं आहे. बॉक्सर मेरी कोमच्याही आधी “सुपर मॉम’ बनलेल्या प्रितम नव्या खेळाडूंकडून खूप आशा आहेत.