अदित्य ठाकरेंची सुरक्षा वाढवली
मुंबई – महाराष्ट्रातील महत्वाच्या व्यक्तींना देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून संबंधीत व्यक्तींना असलेल्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांची फेररचना करण्यात आली आहे. त्यानुसार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला देण्यात आलेली सुरक्षा घटवण्यात आली असून शिवसेनेचे युवा आमदार अदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या एका समितीने हा सुरक्षा आढावा घेतला. या समितीने राज्यातील 90 प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. तेंडुलकरला आत्तापर्यंत एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येत होती पण ती आता काढून घेण्यात आली आहे. सचिनला त्यानुसार रात्रंदिवस पोलिस संरक्षण पुरवण्यात येत होते. पण आता मात्र त्याला तो जेव्हा बाहेर जाईल त्यावेळी त्याला पोलिस एस्कार्ट दिला जाईल.
अदित्य ठाकरे यांना मात्र झेड दर्जाची सुरक्षा दिली जाणार असून त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी जादा पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. या आधी अदित्य ठाकरे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली जात होती. शरद पवार यांची झेड प्लस दर्जाची सुरक्षा कायम राहणार असून त्यांचे पुतणे अजित पवार यांचीही झेड दर्जाची सुरक्षा कायम राहणार आहे. अण्णा हजारे यांचीही सुरक्षा वाढवण्यात आली असून त्यांना वाय प्लस ऐवजी झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाणार आहे.
उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची सुरक्षा झेड प्लस वरून झेड इतकी करण्यात आली आहे. एकनाथ खडसे आणि राम शिंदे या भाजपच्या दोन माजी मंत्र्यांची सुरक्षाहीं कमी करण्यात आली आहे. सरकारी वकिल उज्जवल निकम यांना झेड प्लस ऐवजी आता वाय दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. पुर्वीच्या भाजप सरकार मधील अनेक माजी मंत्र्यांच्या सुरक्षा दर्जातही घट करण्यात आली आहे.