मुंबई : माजी “मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरला अमेरिकेतल्या “पेटा’ या प्राणीहक्क संघटनेने सर्वात सेक्सी शाकाहारी व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. मानुषी स्वतः तर शाकाहारी आहेच, पण ती शाकाहाराचा जोरदार प्रसारही करते.
आंतरराष्ट्रीय व्यासपिठावरूनही तिने शाकाहाराचा जोरदार पुरस्कार केला आहे. तिला जाहीर झालेल्या किताबाबद्दल प्रतिक्रिया विचारली असता “शाकाहार ही आपल्यासाठी एक जीवनपद्धती आहे.’ असे ती म्हणाली. “माझे पालकही शाकाहारी होते. त्यांनी जेंव्हा मला आहाराबाबत पर्याय निवडायला सांगितले तेंव्हा मी काही गमावते आहे, असे मला कधीच वाटले नाही.
मी नेहमीच शाकाहारी होते. माझी निवड बदलावी, असे मला कधीही वाटले नाही.’ असे ती म्हणाली. मानुषीला प्राणी-पक्ष्यांची खूप आवड आहे. शाकाहारी असण्याचे आरोग्यासाठी काही फायदेदेखील आहेत. शाकाहारी अन्न हे अधिक सकस आइ पोषक असते, असे ती मानते.
विशेषतः कोलेस्टेरॉल, रक्तदाबासारख्या बाबी नियंत्रणात ठेवणे, शाकाहारामुळे शक्य होते. शाकाहारी असण्यात आपल्याला आनंद वाटतो आहे. ही बाब आपल्यासाठी अधिक महत्वाची आहे, असेही तिने सांगितले. यशराज फिल्म्सच्या “पृथ्वीराज चौहान’मध्ये ती अक्षय कुमारबरोबर महाराई संयोगिताचा रोल करणार आहे.