पुणे – राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या शहरातील नियोजित प्रकल्प आणि प्रश्नांसंदर्भात महापालिकेतील शिवसेना सदस्य मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत. पुढील आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ मागितली आहे. महापालिकेतील सेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
चोवीस तास समान पाणीपुरवठा, एचसीएमटीआर, भामा-आसखेड, राज्य सरकारकडून महापालिकेला येणे असलेले अनुदान या सर्वांविषयी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडण्यात येणार आहे. शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ज्यावर राज्यसरकारची परवानगी आवश्यक आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे. त्यामुळे आता महापालिकेतील महाविकास आघाडी मिळून हे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेत्यांशी बोलणे झाले आहे. पंतप्रधानांच्या पुणे भेटीवेळी मुख्यमंत्री ठाकरे पुण्यात आले होते. त्यावेळी विमानतळावर त्यांना भेट मिळण्याबाबतचे पत्र देण्यात आले होते. त्यांनी या संदर्भात पुढील आठवड्यात भेटीबद्दल संपर्क करण्यास सांगितले आहे. ती वेळ मिळाली की, महाविकासआघाडीचे सगळे नगरसेवक त्यांना भेटू असे सुतार म्हणाले. यामध्ये भाजपलाही घेणार का, यावर सुतार म्हणाले की, ते आले तर त्यांनाही सोबत घेऊ. त्यांनाही विचारू. शेवटी हा प्रश्न शहराशी निगडित आहे.