अभ्यासक्रम शुल्कवाढ प्रस्तावास विरोध होण्याची चिन्हे
नवीन परिनियमांनुसार स्थगन प्रस्तावांना कात्री
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा शनिवारी (दि. 14) होत आहे. राज्य शासनाने नवीन विद्यापीठ कायद्यानुसार प्रसिद्ध केलेल्या परिनियमानुसार पहिल्यांदाच ही अधिसभा होणार आहे. त्यात स्थगन प्रस्तावास निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अधिसभेत विविध अभ्यासक्रमांचे शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव आहे. या दोन विषयांवर ही अधिसभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
विद्यापीठाने अधिसभेची कार्यक्रमपत्रिका विद्यापीठाने नुकतीच प्रसिद्ध केली. त्यात विद्यापीठ संलग्न महाविद्यालये व संस्थांमधील अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्कात 30, तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 20 टक्के शुल्कवाढ करण्याचा ठराव मांडण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थिती शुल्कवाढ करणे आवश्यक आहे, असे काही अधिसभा सदस्यांचे म्हणणे आहे. शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे वाढीव शुल्कावर विविध विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे यावर काय निर्णय होणार आहे, याकडे लक्ष लागले आहे.
नवीन परिनियमांनुसार स्थगन प्रस्तावांना कात्री लावण्यात आली आहे. त्यावरून अधिसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. तसेच समाजकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतील विलंब, विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये आरक्षण असे विविध ठराव अधिसभा सदस्यांनी मांडले आहेत. या सर्व विषयांवर अधिसभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.