दोन दहशतवाद्यांना अटक
लाहोर – पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील दक्षिणेकडील गुप्तहेर संस्थेवर हल्ला करण्याचा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा कट सुरक्षा यंत्रणेने उधळून लावला आहे. या प्रकरणी इस्लामिक स्टेटच्या दोन दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले.
काही दहशतवादी लाहोरपासून 350 किलोमीटरवरील अलिपूर बायपास मुझफ्फरघर येथे लपून बसले आहेत आणि त्यांनी गुप्तहेर संस्थेच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा कट केला असाल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या पंजाबमधील दहशतवाद विरोधी विभागा (सीटीडी) ला मिळाली. त्यानुसार “सीटीडी’च्या मुलतान विभागाने स्थानिक पोलिस आणि गुप्तचर संस्थेच्या सहकार्याने मंगळवारी या ठिकाणी छापा घातला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या पथकाने दहशतवाद्यांच्या अड्डयाला वेढा घलून त्यांना शरण येण्यास भाग पाडले. अख्तर आलम आणि हुसैन अहमद अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघेही “दाईश’ (इस्लामिक स्टेट)शी संबंधित आहेत. त्यांच्याकडून हॅन्ड ग्रेनेड, शस्त्रे आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले आहे.