राजगुरूनगर येथील सभेत अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांचे प्रतिपादन
राजगुरूनगर – आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातील मुले आहोत. आम्हाला काही नको. मात्र, या भागातील बैलगाडा शर्यत बंद आहे. बैलगाडा शर्यत बंदीविरोधात आंदोलने केली जातात. तालुक्यातील आमदार मात्र पोलिसांच्या भीतीने पळपुटेपणा करतात. आता घाबरू नका, मी आमदार झाल्यावर बैलगाडे खुशाल पळवा. कुणाला घाबरायची गरज नाही. माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. मी खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही, असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी राजगुरूनगर येथील त्यांच्या जाहीर सभेत केले.
राजगुरूनगर येथे बाजार समितीच्या आवारात अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्या प्रचारार्थ अभिनेते देवदत्त नागे यांची प्रचार सभा झाली, त्यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटनेते शरद बुट्टे पाटील, कॉंग्रेसचे नेते अमोल पवार, भाजपचे पांडुरंग ठाकूर, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, कैलास गाळव , चांगदेव शिवेकर, अजय चव्हाण, शिवाजी डावरे, अश्विन भंडलकर, भाऊ फुरसुंगीकर, इसाक शेख क्रांती सोमवंशी, मोहिनी राक्षे, सुनील देवकर, निलेश घुमटकर राजू जाधव, मंगेश गुंडाळ यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या सभेत भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे सचिव इसाक शेख, आबुभाई मोमीन, भाऊ महाराज फुरसुंगीकर यांनी आतुल देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र सर्वांसमोर दिले.
शरद बुट्टे पाटील म्हणाले की, तालुक्यात तीन धरणे असताना या धरणाचे पाणी इतर ठिकाणी जात आहे, त्याचे नियोजन केले जात नाही. भामा आसखेड धरणाचे पाणी पुण्याला नेले जाणार आहे. तालुक्यातील पाणी विकणाऱ्यांना घरी बसवा असे आवाहन केले. स्वतःचे गाव स्वच्छ ठेवता येत नाही असे आमदार आम्हाला नको. आम्हाला ताकदीचा आमदार हवा आहे. यावेळी बुट्टे पाटील यांनी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांची यादी देत आजी-माजी
आमदारांची निष्क्रियतेबाबत घणाघाती टीका केली.
ही निवडणूक विधानसभेची आहेच तशीच येऊ घातलेल्या सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व चाकण आळंदी, राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकांची तयारी आहे. यासाठी आपल्याला सामान्य माणसाच्या नेतृत्वाला संधी द्यायची आहे. आम्ही विकासाचे मुद्दे जनतेपुढे आणले आहेत. तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी अतुल देशमुख यांची उमेदवारी आहे.
– शरद बुट्टे पाटील, गटनेते