अतुल भोसले यांच्या पराभवाची हॅटट्रिक करा

चव्हाण यांचे मतदारांना आवाहन; कलम 370 मुद्यावरून मोदी-शहांवर टीका

कराड  – निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात आलेल्या पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाबाबत एक चकार शब्दही काढला नाही. शेती, बेरोजगारी यावरही ते बोलले नाहीत. ते बोलत आहेत ते 370 वर, ही निवडणूक काश्‍मिरची नाही तर महाराष्ट्राची आहे, असा उपरोधिक टोला नरेंद्र मोदी व अमित शहा यांना पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

दरम्यान, आपल्याला अतुल भोसले यांच्या पराभवाची हॅटट्रिक करायची आहे, असे आवाहनही त्यांनी केले. कराड दक्षिणमधील कॉंग्रेसच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब पाटील, अविनाश मोहिते, मनोहर शिंदे, बंडानाना जगताप, नगराध्यक्षा नीलम येडगे, नगरसेवक सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, इंद्रजित गुजर, राजेंद्र माने, फारुख पटवेकर, इंद्रजित चव्हाण, अशोक पाटील उपस्थित होते.

ते म्हणाले, मोदी यांनी राज्यात सभा घेतल्या. मात्र जनतेचे प्रश्न व्यासपीठावर मांडले नाहीत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणतीही भूमिका घेतली नाही. तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाबद्दल बोला, तुम्ही हे बोलू शकणार नाही. कारण, तुम्ही कोणताही विकास केलेला नाही.देवेंद्र फडणीस यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीबद्दल एक वाक्‍यही बोलले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोणता पायाभूत प्रकल्प पूर्ण केला? हे सांगावे असे जाहीर आव्हान त्यांनी दिले. आज राज्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. सत्तेसाठी पक्ष, नेते, राजकीय मित्र बदलणारे, स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्यांना कराडकर कदापी सहन करणार नाहीत, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.