केडगाव येथील प्रचारात दिलीप हंडाळ यांचे मत
केडगाव- दौंड तालुक्याचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्यामुळे तालुक्यातील समाजातील सर्व जाती-धर्मांना खऱ्या अर्थाने राजकीय न्याय मिळाला आहे, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप हंडाळ यांनी व्यक्त केले.
दौंड विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ केडगाव येथे प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधताना हंडाळे बोलत होते. यावेळी कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप हंडाळ म्हणाले की, थोरात यांच्या नेतृत्वाखाली खरेदी-विक्री संघ, पंचायत समिती आणि बाजार समितीचे कामकाजदेखील सुरळीत सुरू आहे.
माझ्यासारख्या तरूणाला बाजार समितीचे सभापतीपद दिल्याने तालुक्यातील इतर तरुणांच्या मनात थोरातांविषयी आदर निर्माण झाला आहे. समाजातील सर्व जाती-जमातींना बरोबर रमेश थोरात यांचे काम सुरू आहे, त्यामुळे या निवडणुकीत सर्व समाजबांधव निष्ठा आणि जोमाने काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.