राजकारणाला रामराम : पुणे जिल्हा बॅंक, दूध संघाच्या संचालकपदाचा राजीनामा देणार
कामशेत – बाळासाहेब नेवाळे, यापुढे कुठलीही निवडणूक लढवणार नाही, असे मी आज जाहीर करतो. राजकारणामध्ये पैसा आणि दहशतीच्या नावाने यापुढे राजकारण चालणार आहे. मागील कामाचा व चांगल्या माणसाची कोणीही तपासणी करीत नाही. त्यामुळे मी मावळच्या सक्रिय राजकारणाला रामराम करून पुणे जिल्हा बॅंक आणि दूध संघाच्या संचालक पदाचा राजीनामा देत असल्याचे शनिवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत जाहीर केले.
गेल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम देत, आपल्या वेदना बोलून दाखवल्या. याशिवाय आपण केलेल्या कामांची माहिती सांगितली. तसेच मावळातील राजकारण विचारांचे आणि तत्वांचे राहिले नसून, ते दहशत आणि यावर सुरू आहे. त्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली असून, परिणामी चांगली माणसे राजकारणात टिकू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी व दहशतीचा सामना करावा लागत असेल तर ते मला मान्य नाही.
तालुक्याचे राजकारण वेगळ्या वाटेने जात असून, ग्रामीण भागाचा विकास होईल असे वाटत नाही. 1995 साली गोवित्री गावचा सरपंच झालो. गेली 15 वर्षे जिल्हा दूध संघ व जिल्हा बॅंक या सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये काम करतो आहे. जिल्हा दूध संघ तोट्यात असताना मी 2005 साली अध्यक्ष झालो आणि चांगला दूध संघ चालवत तोट्यातून नफ्यात आणला. त्यामुळेच आजही पुणे जिल्हा दूध संघ राज्यामध्ये गोकुळ आणि कात्रज सहकारी संघ म्हणून उत्तम प्रकारचे काम करतो. जिल्हा बॅंकेचे संचालक म्हणून गेल्या चार वर्षांपासून मी त्याठिकाणी काम करीत असून, मावळमध्ये आठ शाखा होत्या. आता तालुक्यात 15 शाखा झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.