शेंगदाणा वधारला : अन्य साहित्याचे भाव स्थिर
पुणे – नवरात्रीच्या उपवासामुळे नागरिकांकडून शेंगदाणा, साबुदाणा, भगरसह उपवासाच्या साहित्यांना मागणी वाढली आहे. मात्र, गुजरातमधील मुसळधार पावसामुळे शेंगदाण्याची आवक थांबल्याने भावात वाढ झाली आहे. उपवासाच्या साहित्यांच्या आवकेसह मागणीतही वाढ झाल्याने त्यांचे भाव स्थिर आहेत.
घटस्थापनेनंतर उपवासाच्या साहित्याला मागणी वाढली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून तेथील शेंगदाण्याची आवक जवळपास थांबली आहे. बाजारात नवीन हंगामातील शेंगदाण्याची आवक नवरात्रापूर्वी होत नसल्याने ऐन नवरात्रोत्सवात बाजारात शेंगदाण्याचा तुटवडा निर्माण होऊन दर तेजीत निघाले आहेत. उपलब्ध असलेल्या शेंगदाण्याची विक्री सध्या करण्यात येत असून त्याची प्रतवारी देखील फारशी चांगली नाही. अगदी हलक्या प्रतिच्या शेंगदाण्याची प्रतिकिलोची विक्री घाऊक बाजारात 100 ते 140 रुपये या दराने केली जात असल्याचे व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले.
मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजारात तमिळनाडूतील सेलम जिल्ह्यातून साबुदाण्याची दररोज 160 टन तसेच नाशिक जिल्ह्यातून भगरीची 5 हजार पोत्यांची आवक होत आहे. शेतकऱ्यांनी साठवणुकीतील माल बाजारात आल्याने साबुदाण्याचे दर उतरले आहेत. मागणीच्या तुलनेत उपवासाच्या पदार्थांची आवक कायम असल्याने दरात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
पिठांना मोठी मागणी
नवरात्रीच्या उपवासानिमित्त भाविकांकडून साबुदाणा, भगर, राजगीरा, शिंगाडा, कुट्टू, शेंगदाणा यासह त्यापासून तयार होणाऱ्या पिठांना दरवर्षी मोठी मागणी राहते. उपवासाची दशमी, पुरी, भाजणी, थालिपीठ तयार करण्यासाठी भाविकांकडून भगरपीठ, राजगीरापीठ, साबुदाणापीठ, कुट्टूपीठ आदींची खरेदी करण्यात येत आहे. बाजारात राजगीरा पीठाची 180 रुपये, साबुदाणा पीठ 140 रुपये, भगरपीठ 140 ते 160 रुपये, शिंगाडा पीठ 400 रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होत आहे.