न्यूयॉर्क – पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अल कायदाला पाकिस्तानातच प्रशिक्षण देण्यात आल्याची कबुली पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. दहशतवादाविरूद्ध हा पाकिस्तानचा सर्वात मोठा कबुलीजबाब आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यापूर्वी अल कायदाच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने प्रशिक्षण दिले होते.
दरम्यान, 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने दहशतवादी संघटनांबाबतचे आपले धोरण बदलले. परंतु पाकिस्तानी लष्कर तस करू इच्छित नसल्याचे त्यांनी अमेरिकन थिंक टँक ‘काऊंसिल ऑन फॉरेन रिलेशन्स’मध्ये (सीएफआर) सांगितले.
तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानची दुसऱ्यांदा कबुली –
अल कायदा आणि त्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेनवर पाकिस्तानकडून गेल्या तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा कबुलीजबाब देण्यात आला आहे. यापूर्वी इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये असल्याची आपल्याला माहिती होती, असे सांगितले होते. आयएसआयने सीआयएला ओसामा पाकिस्तानात असल्याची माहिती दिली होती. त्याच माहितीच्या आधारावर अमेरिकेने त्याच्यावर कारवाई केली, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.