सातारा – एक जुन्या खटल्यात केलेला खर्च परत न दिल्याने तीन लाखांच्या खंडणी मागितल्याप्रकरणी साताऱ्यातील दत्ता जाधव याच्यासह त्याचा भाऊ युवराज यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अनिल महालिंग कस्तुरे (रा. करंजे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला असून युवराज जाधव याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दत्ता जाधव सध्या कारागृहात असल्याने या गुन्ह्यात सातारा शहर पोलीस त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, 2016 मध्ये एक बिल्डरला खंडणी मागितल्याप्रकरणी यातील फिर्यादी व दत्ता जाधव हे संशयित होते. त्या खटल्यात तक्रारदारांचा वकील व इतर खर्च तीन लाख केल्याचे सांगत दत्ता जाधव व त्याचा भाऊ युवराज खंडणी मागत होते. 17 जून 2016 पासून ते 21 सप्टेंबर 2019 पर्यंत हा प्रकार चालू होता. मात्र, तक्रारदाराने “माझ्या केसचा खर्च माझ्या पत्नीने केला असल्याने मी तुम्हाला असे कुठलेही पैसे देणार नाही,’ असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या युवराजने दि. 21 रोजी तक्रारदार व त्यांचा मित्र कोरेगावला त्यांच्या मालकीच्या कारमधून (एमएच 11 सीयू 3773) निघाले होते.
त्यावेळी युवराजने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ त्यांची गाडी थांबवून पैशाचे काय करणार, कधी देणार असे विचारले, त्यावर तक्रारदार यांनी मी पैसे देणार नाही असे सांगताच चिडलेल्या युवराजने जर तू तीन लाख रुपये दिले नाहीस तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेन, तसेच जीवाला मुकशील, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने युवराज जाधव याला अटक करून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एम. वाळवेकर करत आहेत.