शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्तांकडे केली मागणी
नगर – माळीवाडा येथील कचरा रॅम्प मुळे शाळकरी मुलांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने शहरातील कचरा संकलन करून परस्पर कचरा डेपो न्यावा, अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येइल असा इशारा शिवसेनेचे पदाधिकारी यांनी दिला आहे.
शुक्रवारी (दि.19) रोजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाचे उपायुक्त सुनिल पवार यांची भेट घेवून तक्रारीचा पाढा वाचला. व तुम्ही स्वत: या परिसराची पाहणी करण्याचे सुचवले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, पोलीस उप अधिक्षक संदीप मिटके, अतिक्रम विभाग प्रमुख सुरेश इथापे, परेश लोखंडे आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील कचरा संकलन करून छोट्या वाहनाने माळीवाडा येथे आणला जातो. पुन्हा तो कचरा मोठ्या वाहनातून दुसरीकडे घेवून जातात त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात शाळा आहेत. येथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामुळे या मुलांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा रॅम्प हटविण्यासाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आले. मात्र, मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. हा प्रश्न लवकरात लवकर न सुटल्यास शिवसेना कुठला ही इशारा न देता आंदोलन करेल अशा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.