अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही मिळणार ‘कृषी संजीवनी’

पुणे – जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली असून त्यामुळे यापूर्वी अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांपूरता देय असलेला या प्रकल्पाचा लाभ आता 2 ते 5 हेक्‍टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.

विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि हवामान बदलास अतिसंवेदनशील असणारी 4 हजार 210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदी खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील 932 गावे अशा एकूण 5 हजार 142 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामान अनुकूल कृषी प्रकल्प) राबविण्यात येत आहे. जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4 हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे. ही अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रकल्प सुकाणू समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे.

या सुधारणांनुसार, गावातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांबरोबरच आता 2 ते 5 हेक्‍टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांनादेखील प्रकल्पांतर्गत विविध बाबींसाठी लाभ दिला जाणार आहे. गावातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी आणि भूमीहीन कुटुंबे यांना वैयक्‍तिक लाभाच्या बाबींसाठी अर्थसहाय्याचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांवरून आता 75 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच 2 ते 5 हेक्‍टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना 65 टक्‍के अर्थसहाय्य दिले जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकरी गटांना 60 टक्‍क्‍यांच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.