महापौर राहुल जाधव : हिंद कामगार संघटनेचा वर्धापन सोहळा
पिंपरी – राष्ट्रीय पातळीवर उद्योग, व्यवसायात वाढ व्हावी, यासाठी देशात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली पाहिजे. त्या उद्देशाने केंद्र सरकार अनेक क्षेत्रात एफडीआयला अनुकूल धोरण आखत आहे. या राष्ट्रीय उद्योग धोरणामध्ये कामगारांचे हित जोपासले जावे, अशी मागणी आपण कामगार नगरीचा प्रथम नागरिक या नात्याने केंद्र व राज्य सरकारकडे करू, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी केले.
हिंद कामगार संघटनेच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त खराळवाडी, पिंपरी येथे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ज्येष्ठ कामगार नेते माधव रोहम यांना “हिंद रत्न कामगार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरु कदम, इंटकचे जिल्हा सरचिटणीस मनोहर गाडेकर, खडकी ऍम्युनिशन फॅक्टरी प्रतिनिधी शशिकांत धुमाळ, संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, खजिनदार सचिन कदम, कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्रसिंह वालिया, अब्दूल अजीज, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंद फडतरे, अनिल रोहम, उमेश धर्मगुत्ते आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते माधव रोहम यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी हिंद कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते पंचवीस हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी महापौर राहुल जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
स्वागत, प्रास्ताविक करताना डॉ. कैलास कदम म्हणाले की, देशभर औद्योगिक मंदीचे सावट आहे. पिंपरी चिंचवड उद्योगनगरी ही ऑटोमोबाईल क्षेत्रांशी संबंधित कामगारनगरी आहे. या क्षेत्रात जास्त मंदी आहे. लघुउद्योगांवर आणि कायम व कंत्राटी कामगारांच्या कुटुंबांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. कामगारांचे न्याय हक्क देखील अबाधित राहिले पाहिजेत. यासाठी कामगारनगरीचे प्रथम नागरिक या नात्याने महापौरांनीदेखील केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी डॉ. कदम यांनी केली. सूत्रसंचालन यशवंत सुपेकर यांनी केले. आभार सुरेश सरडे यांनी मानले.