समस्यांकडे पक्षाचे दुर्लक्ष असल्याची नागरिकांची भावना
सासवड – पुरंदर तालुक्याचे गाव असलेल्या सासवड शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फक्त नावापुरताच उरला आहे काय, अशी चर्चा नागरिकांत रंगू लागली आहे. शहरांतर्गत अनेक समस्या असताना कोणतेही भाष्य करण्यास पक्ष सक्षम नाही का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सासवड नगरपालिकेत एकूण 19 नगरसेवक असताना यात कॉंग्रेसचे 15 नगरसेवक सत्ताधारी आहेत. तर, विरोधक म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस 2 आणि शिवसेनेच्या 2 नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. यात शिवसेनेकडून काही प्रमाणात सत्ताधाऱ्यांना विविध मुद्यांवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो. कारण, शहर शिवसेनेकडूनही त्यांच्या नगरसेवकांना तसे पाठबळ मिळत आहे. परंतु, राष्ट्रवादीबाबत मात्र वेगळेच चित्र निर्माण झाल्याची स्थिती आहे.
शहरातील प्रश्नांवर नगरसेवक बोलत असताना शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी मात्र काहीच बोलत नसल्याची स्थिती आहे. नागरिकांच्या न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, मोर्चे काढणे यापासून गेली कित्येक दिवस हा पक्ष लांबच राहिलेला आहे. कॉंग्रेस पक्षाशी आघाडी असली तरी स्थानिक प्रश्न सोडविताना या पक्षाने आपली कर्तव्य विसरू नयेत, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
सासवड शहरात कायम असलेल्या समस्यांमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे. यावेळी तर जलसंपदा खात्याच्या कारभाराचा फटका बसल्याने शहरात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती, अशावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंत्र्यांशी संपर्क साधला. हा प्रश्न शिवसैनिकांनीही उचलला. परंतु, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी कॉंग्रेससह राज्य मंत्र्यांनाही जाब विचारणे अपेक्षित होते. परंतु, याबाबत राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने मंत्र्यांकडे विचारणाही केली नाही.
सासवडच्या प्रशासकीय इमारतीचे काम, बस स्थानकातील शौचालयाची दुरवस्था, एसटी व्यवस्थेतील गैरसोय, तलाठी कार्यालयात होणारी आर्थिक लूट, शहरातील वाहतूक कोंडी यासारखे शेकडो प्रश्न नागरिकांना भेडसावत असताना शासन व प्रशासनाला विरोधी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही धारेवर धरणे अपेक्षित आहे. सासवडच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी निवेदन, मोर्चा, धरणे, उपोषण यासारख्या कायदेशीर मार्गाने शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही लढा द्यावा, अशी अपेक्षा प्रत्येक सासवडकरांची असताना अशा गोष्टींकडेच दुर्लक्ष होत असल्याने पक्षाची पिछेहाट होत नाही ना, अशीही चर्चा आहे.
संपर्क नाहीच…
सासवड शहर तसेच नगरपालिकेविषयी माहिती विचारण्यासाठी संपर्क साधला असता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक तसेच पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. यामुळे शहराबाबत नेमकी भूमिका समजू शकली नाही.