पूरस्थितीमुळे महापालिका प्रशासनाचा निर्णय
पुणे – शहर तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यावर महापालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालये तसेच प्रसृतीगृह रविवारी आणि सोमवारीही (बकरी ईद) सुरू राहणार आहेत. सकाळी
9 ते दुपारी 1 या वेळेत ही सुरू असतील, असे महापालिकेच्या आरोग्य विभागप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.
पुणे महसूल विभागात पूर परिस्थिती असल्यामुळे मदत उपलब्ध देणे आवश्यक असल्यामुळे विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय आदेश काढले असून त्यात आपत्कालिन स्थितीशी संबंधित सर्व कार्यालये सुट्टीदिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी, रविवार तसेच सोमवारी बकरी ईद असल्याने सर्व कार्यालयांना सलग तीन दिवस सुट्टी असल्याने पूरग्रस्तांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने हे आदेश काढले आहेत. यानुसार, महापालिकेनेही आपली आरोग्य सेवा या तीनही दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्व 63 दवाखाने सकाळी 9 ते दुपारी 1 वेळेत सुरू असतील.