पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या पत्नी लेखिका अदिती हर्डीकर यांच्या कला आणि राष्ट्रविचार या ग्रंथास विदर्भ संस्कार भारतीकडून उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ लेखक शेषराव मोरे यांच्या साहित्याचाही गौरव होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे उद्या (शनिवारी) आयोजित विदर्भ संस्कार भारतीच्या प्रांत अधिवेशनात पुरस्काराचे वितरण होईल. चंद्रपूर येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. संस्कार भारती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कला व सांस्कृतिक वाहिनी असून संस्थेने यावर्षी सुरू केलेला पहिला पुरस्कार वैचारिक लिखाणासाठी निश्चित केला होता.
त्यानुसार शेषराव मोरे लिखित व राजहंसतर्फे प्रकाशित गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी तसेच विवेकानंद केंद्राच्या मराठी विभागातर्फे प्रकाशित व अदिती हर्डीकर लिखित कला आणि राष्ट्रविचार या साहित्यकृतींना तो दिला जाईल. मानपत्र आणि 15 हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथील कलापारंगत अदिती हर्डीकर या उत्तम निवेदिका, सृजनशील चित्रकार व ललित लेखिका आहेत. भगिनी निवेदिता यांच्या कला विचारांचे समीक्षण करणारे कला आणि राष्ट्रविचार हे वैचारिक पुस्तक त्यांनी लिहिले आहे.