नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर काल कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या बंडखोर आमदारांनी बंगळुरू येथील विधान सौध भवनात कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांची भेट घेतली होती. मात्र विधानसभा अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीनंतरही काहीच तोडगा न निघाल्याने आज सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज सदर प्रकरणाची सुनावणी येत्या मंगळवारी घेण्यात येईल असे स्पष्ट केले.
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये बंडखोर आमदारांतर्फे मुकुल रोहतगी हे तर काँग्रेसतर्फे अभिषेक मनू संघवी यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणी बंडखोर आमदारांची बाजू मांडताना विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी विधानसभा अध्यक्ष हे काही अपवाद वगळता सर्वोच्च न्यायालयाला उत्तर देण्यास बंधनकारक असल्याचे सांगितले. तर काँग्रेसतर्फे बाजू मांडताना काँग्रेस नेते व जेष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू संघवी यांनी आमदारांचा राजीनामे सादर करण्यामागचा हेतू हा वेगळाच असून आमदारांना राजीनामा देऊन अपात्र ठरण्यापासून वाचायचे आहे असा दावा केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची बाजू मांडताना डॉक्टर राजीव धवन यांनी, आमदारांनी विधानसभा अध्यक्षांवर लावलेल्या पक्षपातीपणाच्या आरोपांवर आक्षेप नोंदवला.