“फिटनेस सर्टिफिकेट’साठी उमेदवारांची लुट
पुणे – एसटी महामंडळाच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांकडून “फिटनेस सर्टिफिकेट’साठी पॅनेलवरील डॉक्टर जादा पैसे उकळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे या कारभारावर वचक ठेवण्याचा निर्णय घेतला असून या डॉक्टरांच्या दवाखान्यात दोन अधिकाऱ्यांचा खडा पहारा असणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने वाहक, चालक आणि अधिकारी पदाच्या दहा हजार जागा भरण्यात येणार आहेत. ही भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र, सरकारी दवाखान्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर शारीरिक चाचणी कमी वेळात शक्य नाही. त्यामुळे या उमेदवारांची खासगी डॉक्टरांकडून करून घेण्याची सवलत दिली आहे. त्यासाठी महामंडळाच्या वतीने खासगी डॉक्टरांचे पॅनेल तयार केले आहे. त्यासाठी उमेदवारांकडून शंभर रुपये घेण्याची मुभा या डॉक्टरांना देण्यात आली आहे.
मात्र, काही खासगी डॉक्टर या उमेदवारांकडून तब्बल पाचशे ते हजार रुपये घेत असल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात काही उमेदवारांनी महामंडळाच्या शंकरशेठ रस्त्यावरील मुख्य कार्यालयात तक्रारी केल्या होत्या. महामंडळाने त्याची खातरजमा केल्यानंतर त्यामध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात दैनिक “प्रभात’ने 12 जूनच्या अंकामध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने पॅनेलवरील डॉक्टरांच्या दवाखान्यात दोन अधिकारी अथवा कर्मचारी नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पॅनेलवरील डॉक्टरांच्या दवाखान्यात दोन अधिकारी नेमण्यात आले होते. यापुढील कालावधीतही हीच दक्षता घेण्यात येणार असून त्यामुळे भरती प्रक्रियेतील उमेदवारांना दिलासा मिळेल असा दावा एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या विभागीय नियत्रंक यामिनी जोशी यांनी दिली.