पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी 70 हजार 941 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 31 हजार विद्यार्थ्यांचे अर्जांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पूर्ण झाल्याची माहिती अकरावी प्रवेश समितीकडून देण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग 1 भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 27 मे पासून संकेतस्थळ खुली करण्यात आली. शाळा व मार्गदर्शन केंद्रामार्फत माहिती पुस्तिकांचे वाटपही केले आहे. माहिती पुस्तिकांचा अभ्यास करून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी शाळांमार्फत अर्ज भरत आहेत. यंदा पुण्यासाठी किमान प्रवेश क्षमता 90 हजारांच्या पुढे आहे. त्यासाठी विद्यार्थी अर्ज करीत असून गुरुवार सायंकाळपर्यंत 71 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.
23 हजार 369 अर्जांची स्वयंचलित प्रणालीद्वारे पडताळणी पूर्ण झाली आहे. 16 हजार 355 अर्जांची अद्याप पडताळणी पूर्ण झालेली नाही, अशी माहिती अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी दिली. राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासाठी सर्वाधिक 1 लाख 71 अर्ज दाखल झाले आहेत. नाशिक विभागात 22 हजार 334, नागपूर विभागातून 24 हजार 534 , अमरावती विभागातून 5 हजार 525, तर औरंगाबाद विभागातून 9 हजार 830 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यानुसार अर्जांची पडताळणी सुरू आहे.